Saturday, 16 December 2017

आदिवासी गोंड समाजाची बदलती परिभाषा



आदिवासी गोंड समाजाची बदलती परिभाषा

भारत हा विविधतेने नटलेला आहे असे आपण नेहमी म्हणतो पण जेव्हा या विविधतेचे प्रत्यक्ष दर्शन होते तेव्हा यातील प्रखरता डोळ्याने अनुभवता येथे खऱ्या अर्थाने भारत हा कसा वेगळा आहे आणि त्याने किती वेगवेगळ्या जातींना - जमातींना सामावून घेतले आहे ते प्रत्यक्षात पाहायला मिळते. सध्या काही दिवस प्रशिक्षण शिबीराच्या निमीत्ताने “ धरामित्र ” या संस्थेकडे विदर्भात काम करायला मिळाले आणि खऱ्या अर्थाने आदिवासी समाज आणि त्याची स्थिती जवळून पाहता आली आणि त्याचा अभ्यास करता आला. वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यात पाचोड आणि एकबुर्जी या गावातील आदिवासी समाज पहावयास मिळाला. ही गावे साधारण वर्धा शहरापासून ३० किमी अंतरावर वसलेली आहेत. पाचोड गावात कोलाम हा आदिवासी समाज जास्त प्राणावर राहतो तर येथील एकबुर्जी गावात ९० % गोंड समाज राहतो. एकबुर्जी गावात गोंड समाजातील एक युवक चांगला परिचयाचा झाला त्याचे नाव पंकज. पंकजकडून गोंड समाजाची बरीच माहिती मिळाली आणि या समुदायाविषयी जाणून घेता आले. 
गोंड जमातीचे प्रतिक

गोंड समाज हा प्रामुख्याने मध्य भारत म्हणजेच मध्यप्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगढ या राज्यात जास्त प्रमाणावर वास्तव्यास आहे. असे म्हणतात की गोंड समाज हा पहिला भारतातील मूलनिवासी आहे म्हणजेच पूर्वीपासून भारतात गोंड आदिवासींची सत्ता होती ते भारताचे राजे होते. यामध्ये भिल्ल, माडिया, कोरकू, प्रधान, उरराव, राजगोंड इत्यादी गोत्रांचा समावेश होतो. त्यानंतर झालेले परकीय आक्रमण, स्थलांतर, ब्रिटीश सत्ता यासारख्या कारणांनी हे साम्राज्य लोप पावत गेले. ह्या समाजाची गोंडी हि बोलीभाषा आहे. पूर्वी हा समाज शिकार व शेती यावर जगत होता. पण सध्या शिकार हि संकल्पना लोप पावत असल्यामुळे त्याला मर्यादित स्वरूप आले आहे. सध्या फक्त शेती, पशुपालन व इतर रोजगार यावर हा समाज आर्थिक द्रुष्टीने अवलंबला आहे.
गोंड हि आदिवासी जमात निसर्गालाच देव मानते व निसर्गपूजा करते. यांच्या समाजाचे प्रतिक म्हणजेच एक चिन्ह आहे त्यामध्ये जल, अग्नी आणि जमीन हे तीन महाभूते प्रतीके म्हणून दाखवलेली आहेत यालाच गोंडवाना ध्वज असेही म्हणतात. यातूनच निसर्गाविषयी असणारी गोंड आदिवासी जमातीची आस्था दिसून येते. हा समाज मूर्तीपूजा मानत नाही तर निसर्गपूजा अग्रस्थानी मानतो. रावण हा गोंड समुदायाचा राजा होता असे म्हंटले जाते. यामुळे रावण राजाची पूजा येथे केली जाते. मोहाची फुले व त्याने पाणी शिंपडून येथे देवपूजा होते  आणि शेंदूर वगेरे न वापरता फक्त हळद येथे वापरली जाते. या समाजामध्ये ऐकून ७५० गोत्र आहेत. यातील प्रमुख गोत्र १२ आहेत याचा विचार सोयरिक जुळवताना म्हणजेच लग्न जुळवताना केला जातो. येथे सम – सम नंबरामध्ये म्हणजेच गोत्रामध्ये लग्न केले जात नाही तसेच विषम - विषम  गोत्रामध्ये सुद्धा लग्न केले जात नाहीत. (उदाहरणार्थ गोत्र १ व ३ मध्ये लग्न करता येत नाही व गोत्र २ व ४ मध्ये सोयरिक होत नाही.) असे काही नियमने या आदिवासी समुदायामध्ये आढळून येतात. या समुदायामध्ये पिळवा रंग हा शुभ मानला जातो. लग्नात प्रामुख्याने वधू पिवळे लुगडे आणि नवरदेव पांढरा बंगाली कुर्ता व पिवळा फेटा घालतो. गोत्राचे ७ लिंबू व मातीचे ७ मडके ठेऊन येथे पूजा मांडली जाते व याला फेरे घेऊन विवाह संपन्न होतो. तसेच लग्नात डोक्यावर अक्षता म्हणून तांदूळ न टाकता फुले टाकली जातात हे या समाजाचे वैशिष्ट आहे.
१९७१ साली सर्वोच्च नायालयाने दिलेल्या निर्णयानुसार हा समाज हिंदू धर्मामध्ये गणला जात नाही हा स्वतंत्र धर्म आहे न्यायव्यवस्थेचे म्हणने आहे. सध्या हा समाज प्रगतीच्या वाटेवर येताना दिसून येतो आहे. शिक्षण, आरोग्य, राहणीमान यासारख्या गोष्टी बदलताना दिसून येत आहेत. तरीही अजून अपेक्षित बदल व प्रगती सध्या करण्यासाठी अजून चांगली धोरणे व कायदे करण्याची गरज भासत आहे. प्रामुख्याने या जमातीच्या उद्धारासाठी त्याची नक्की गरज काय आहे हे समजून घेऊन त्यावर धोरणे राबवने खुप महत्वाचे असल्याचे मला वाटते. यामुळे गोंड आदिवासी जमात नक्कीच विकासाच्या प्रवाहात येईल असे म्हणण्यात दुमत नाही.   



No comments:

Post a Comment

गोळाबेरीज.........

                                                            लेखक – प्रविण पारसे                                          आज सकाळी स...